नवी दिल्ली : युपीआय व्यवहारांसंदर्भात केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. व्यापारी वर्गात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आता केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्काबाबचा हा निर्णय फिरवला आहे. त्यामुळे आता निवडक व्यापारी युपीआयव्यवहारांवरच MDR शुल्क लागू होईल. तसेच यापूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत म्हणजे 15 ऑक्टोबपासून होणार होती. मात्र, नव्या घोषणेनुसार केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणी ही दिवाळीनंतर लागू होईल, असे सांगितले आहे. दिवाळीच्या तोंडावर हा व्यापारी आणि ग्राहक या दोहोंसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
मात्र,दिवाळीनंतर UPI व्यवहारांवर MDR शुल्क हे तात्काळ लागू होईल, असे NPCI च्या UPI अँड सर्व्हिसेस स्टीअरिंग कमिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. शुल्क लागू करण्याची निश्चित तारीख स्वतंत्रपणे जाहीर होईल. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णयाची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. दिवाळीनंतरही सरसकट सर्व UPI व्यवहारांवर नाही, तर निवडक व्यापारी व्यवहारांवरच शुल्क लागू होणार असल्याचे UPI अँड सर्व्हिसेस स्टीअरिंग कमिटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर व्यापाऱ्यांना 0.4 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. सामान्य ग्राहकांना UPI पेमेंटवर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नव्हते. NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांना UPI द्वारे होणाऱ्या 2000 रुपयांच्या व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क भरावे लागणार होते. यामध्ये सामान्य ग्राहकांचा समावेश नव्हता. मात्र, इतर कोणत्याही कराप्रमाणे व्यापारी वर्गाकडून यूपीआय व्यवहारांचे शुल्कही अंतिमत: ग्राहकांकडूनच वसूल केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे याचा फटका सामान्य वर्गालाही बसण्याची दाट शक्यता होती. मात्र, आता निवडक व्यापारी यूपीआय व्यवहारांवरच शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापारी आणि सामान्य ग्राहक दोघांनाही दिलासा मिळणार आहे. परंतु, कोणत्या यूपीआय व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.